राजद्रोही : सेंट व्हॅलेंटाईन
१४ फेब्रुवारी म्हटलं की; पौगंडावस्थेतील युवांमध्ये एक वेगळीच भावना उत्पन्न होते.
हा दिवस बऱ्याच भागांतून " प्रेमिकांचा दिवस " म्हणून साजरा केला जातो.
या दिवशी व्यक्त केले किंवा मिळालेले प्रेम हे अमर असते अशी काहीशी धारणा आजकाल झालेली दिसते.
प्रसारमाध्यमे देखील या दिवसाचा " प्रेम व्यक्त करण्याची सुवर्णसंधी " अश्या शब्दात गवगवा करताना दिसतात
आणि म्हणूनच हा दिवस अगदी उत्साहात साजरा केला जातो. आपल्या प्रियकर किंवा प्रेयसी भेट वस्तू देऊन आपले प्रेम व्यक्त करणे असे काहीसे याचे स्वरूप आहे. आणि म्हणूनच ज्या सेंट वॅलेन्टाईनचा कसलाही संबंध नसणाऱ्या भारतासारख्या देशात या दिवसाच्या नावाखाली करोडोंची उलाढाल होते.
हा दिवस साजरा करणाऱ्या बहुतेक जणांना कोण बाबा हा " सेंट व्हॅलेंटाईन " हे देखील माहित नसते. आम्हाला देखील हा प्रश्न पडला आणि मग इंटरनेटवर याचा शोध घेतला.
वेगवेगळ्या ठिकाणी याचा शोध घेतल्यावर एकाच स्वरूपाची माहिती समोर आली आणि तीच माहिती आम्ही आपणापुढे मांडत आहोत.
हा सेंट व्हॅलंटाईन तिसऱ्या शतकामध्ये रोम च्या एका चर्चचा पुजारी (प्राइस्ट) होता. रोमचा राजा त्यावेळी आपले राष्ट्र मजबूत राहावे या करता सैनिकीकरणाला महत्व देणारा होता.
आपल्या राष्ट्रासाठी लढणारे सैनिक कौटुंबिक मोहपाशात अडकून राष्ट्रीय कर्तव्यात कमी पडू नये म्हणून; सैनिकांना कर्तव्यावर असताना लग्न करण्याची परवानगी नसे. रोम मधील कोणताही ख्रिश्चन पुजारी (प्राइस्ट) अशी लग्ने लावत नसे. अर्थात हा राजाचा आदेश असल्याने आणि कदाचित त्याकाळी राष्ट्राच्या दृष्टीने हितावह असल्याने या आदेशाचे तंतोतंत पालन होत असे. परंतु कथित संत असणाऱ्या सेंट व्हॅलेंटाईन, सैनिकांची चोरून लग्ने लावत असे.
त्याच्या या राजद्रोहासाठी तत्कालीन राजा क्लॉडिअस ( दुसरा ) याने व्हॅलेंटाईनला पकडून कारागृहात टाकले आणि देहदंडाची शिक्षा दिली. त्याच्या मृत्यू नंतर तब्बल २५० वर्षाने त्याला रोमन चर्च मधून सेंट ही पदवी दिली आणि त्याच्या नावाचा दिवस पाळायला सुरुवात केली.
जरी रोमन कॅथलिक चर्चने त्याला संतपद दिले असले तरी १९६९ मध्ये, वॅलेन्टाईनबद्दल विश्वसनीय माहिती नसल्याने त्याचे नांव चर्चच्या वार्षिक उत्सवांमधून वगळण्यात आले.
विश्वसनीय माहिती नाही म्हणून ज्याला त्याच्याच देशात वार्षिक उत्सवात त्याचे पूजन किंवा स्मरण नाकारले, त्या कथित संताच्या नावाने भारतीयांनी उत्सव साजरे करणे हे किती योग्य आहे.
ज्या देशाने राजद्रोह करणाऱ्यांना हत्तीच्या पायी दिलेले पहिले आहे, राजाचा आदेश हा ईश्वराचा आदेश मानाला आहे अश्या या भारतीय देशात, एका राजद्रोही प्राइस्टच्या नावाने गळा काढणे हे मूर्खपणाचेच लक्षण आहे असेच आम्हांस वाटते.
प्रेम करायला भारतीय संस्कृतीमध्ये नकार नाहीच, भारतीय इतिहासामध्ये प्रेमकथा देखील आहेतच. त्यामुळे प्रेम करायला विरोध नाही परंतु ईश्वरीय अनुकंपा समजल्या जाणाऱ्या प्रेमाला व्यक्त करण्याकरता एका राजद्रोही कथित संतांच्या नावाच्या कुबड्या कशासाठी ?
१४ फेब्रुवारीच्या निमित्ताने प्रेमाच्या नावाखाली घडणारे अनैतिक प्रकार हे भारतीय संस्कृतीला लांच्छनच आहे.
लक्षात ठेवा प्रेम मनुष्याला दुबळे करणारे नव्हे तर त्याला प्रसंगी आधार देऊन शक्ती देणारे असावे. प्रेम म्हणजे नैतिकता, आदर आणि मुख्य म्हणजे नाजूक भावना. या भावनेला आदरानेच पाहावे आणि प्रेम म्हणून जेंव्हा व्यक्त होईल तेंव्हा ते समाजाने आदर करावा असेच असावे.
आणखी एका गोष्टीचे आश्चर्य वाटते ते म्हणजे १४ फेब्रुवारीचा वेलेन्टाइन डे आम्हाला लक्षात असतो परंतु अवघ्या ३ वर्षांपूर्वी याच दिवशी झालेला पुलवामावरील हल्ला आणि भारतीय सैन्याचे हुतात्मा झालेले ४० जवान मात्र आपण विसरून जातो.
कोणाचे हौतात्म लक्षात ठेवायचे राजद्रोही वॅलेन्टाईनचे का राष्ट्रप्रेमी सैनिकांचे ? विचार तुम्ही करायचा आहे !!!!
संदर्भ :
१) https://www.britannica.com/biography/Saint-Valentine
२) https://indianexpress.com/article/lifestyle/life-style/happy-valentines-day-2022-history-importance-and-significance-7722518/
३) https://en.wikipedia.org/wiki/Valentine%27s_Day
Comments
Post a Comment